औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्लक्षित अशी पर्यटन स्थळे - भाग तीन
लोज्या किल्ला किंवा गोपेवाडी किल्ला , काळदरी, किल्ले अंतूर
हा परिसर पाहण्यासाठी तुम्हाला रेल्वेने किंवा बसने चाळीसगाव येता येईल. चाळीसगाव हे धुळे सोलापूर महामार्गावरील तालुक्याचे शहर. येथून कन्नड 30 किलोमीटर हा परिसर पाहण्यासाठी चाळीसगाव किंवा कन्नड थांबता येईल. चाळीसगाव आपण जर कन्नड जालं तर ऑष्ट्रम घाटातून जावे लागते. हा घाट साधारणता 11 किलोमीटर लांबीचा खूप उंच आणि निसर्गरम्य असा आहे.
नवीन प्रवास करणाऱ्याला हा घाट चढून गेल्यानंतर आपण पुन्हा डोंगर उतरू असं वाटत असतं. पण तसं होत नाही .हा घाट, उंच डोंगर चढून गेल्यानंतर भरपूर सपाटी आहे.त्या सपाटीवर पुढची शहर वसलेली आहेत.
हा परिसर पाहण्यासाठी तुम्ही नागदहून जाल तर त्यासाठी चाळीसगावहून सोयगाव जाणाऱ्या कोणत्याही बसने नागद उतरता येते. नागद मध्ये अलीकडे नव्याने बांधलेलं बालाजी मंदिर आहे. नागादच्या बाहेर आल्यानंतर बेलखेडा सोयगाव दिशेने जाताना रस्त्यावर उजव्या बाजूने डोंगराकडे जाणारा रस्ता हा गोल टेकडी किंवा लोज्या किल्ला , किंवा गोपेवाडी किल्ला म्हणून ओळखतात तो मोटरसायकलने किंवा पायी जाता येईल. उंच अशी गोल टेकडी आहे. त्यावर काही पाण्याची टाकी कोरलेली आहेत काही लेण्या आहेत त्यामध्ये अलीकडे महादेवाची पिंड वगैरे बसवण्यात आली आहे. डोंगराला लागून ही गोल टेकडी आहे. हा किल्ला असावा किंवा कोरीव लेण्या सगळ्यात किंवा रस्त्यावरील विश्रांतीची जागा असावी. पुढे किले अंतूर जाण्यासाठी तुम्हाला पिंपरी वडगाव आणि मग वडगाव होऊन किनी, दस्तापुर असं जावं लागेल. किल्ल्याच्या पायथ्याशी काळदरी मध्ये शाळेपर्यंत दुचाकी किंवा चार चाकी वाहनाने जाता येते काळदरी ही आदिवासींची वस्ती तेथून चढून किल्ला पहावा लागेल.
किल्ले अंतूर हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एक मध्यम असा डोगरी किल्ला . याला नागद किल्ला किंवा नागापूर किल्ला असेही म्हणतात . मराठवाडा आणि खान्देश यां भूप्रदेशांना विभागणा-या या डोगराला संह्याद्रीची विध्यांद्री रांग. वा सातमाळ किंवा अजिंठा डोगराची रांग या नावांनी ओळखतात. समुद्रसपाटी पासून २७०० फूट म्हणजे साधारणतः ८३० मिटर उंचीवर, २०. ४८ व ७५. ४३ अक्षांश रेखांशावर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ला हा १५ व्या शतकांत मराठा सरदाराने बांधला असावा किंवा यादवांच्या काळात तो बांधला गेला असावा. पुढे अहमदनगरचा बुरहान निझाम शाह (३रा) यांच्या ताब्यात होता. तर १७ व्या शतकांत तो मोगल औरंगजेबांच्या ताब्यात होता. या किल्ल्याला चाळीसगांवहून नागद,गोपेवाडी वा वडगांव, किन्ही,दस्तापूर, काळदरी असा रस्ता असून, खालून पायी चढून वर जाता येते कन्नड येथून नागपूरहून खोलापूर पर्यत व पुढे किल्ल्या पर्यत वाहनाने जाता येते. खोलापूरहून जातांना रस्त्यात १५८८ साली मुताऀज निझाम शाह
याच्या काळात रोवलेला पशिऀयन भाषेत कोरलेला एक दिशादर्शक स्थऺभ दिसतो . किल्ला अजूनही चांगल्या स्थितीत असून त्याच्या वैभवाची साक्ष देणारे तिन मोठे दरवाजे आजही शाबूत आहेत किल्ल्यात आजही बराचसा बाधकामाचा भाग हा चांगल्या स्थितीत असून त्यांची निगा राखण्याची गरज आहे. पाण्याचेी भुयारी टाकी व पाण्याचा मोठा तलाव आजही चांगल्या स्थितीत आहेत. या तलावाच्या मध्यभागी एक भिंतही आहे . ती पाण्याखालीच असते. या तलावातील पाणी वर खेचण्यासाठी मोटेसाठीची धाव व थारोळे( थाळणे) चांगल्या स्थितीत असून
त्यात झाडोरा वाढला आहे . अलीकडे महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी चार कोटी रुपये खर्च करून डागडूजी केली आहे. या डागडूत त्यांनी हे थारोळे आणि नहरद्वारे पाणी जाण्याची व्यवस्था हे सारे सारे नष्ट केला आहे. मोट ओढण्याच्या खूणा आजही दिसतात. त्याच बाजूला जलदेवतेची पूजा स्थानिक आदिवासी करतात. किल्ल्याच्या मध्यवतीऀ उंच भिंत उभारुन किल्ल्याचा अधाऀ भाग संरक्षीत केलेला दिसतो. भागात काही ठिकाणी भुयारी मार्ग तर काही ठिकाणी भुंयारी कोठारेही आहेत. दुस-या प्रवेश द्वारावर एक ६ फूट बाय २फूट
असा शिलालेख आहे. सुल्तान बुरहान निझाम शाह याच्या राज्यकारभारासाठी आशिऀवाद मागितलेले असून हे भव्य प्रवेशव्दार नासिर फरहाद खान, जो मलिक अंबरा पुरस्कताऀ होता त्याने बांधल्याचा उल्लेख आहे.( १०३५ हि ) दुसरा शिलालेख हा तलावा शेजारील पश्चिम टोकावर असलेल्या मशिदीवर आहे मऺदिरसादृष्य अवशेषांसह बांधकामावरील ही मजीद आहे असाही संदर्भ आढळतो (सिताराम गोयल- मदिरे पाडून महाराष्ट्रात उभारलेल्या मशिदीची यादी). ती १६२५ मध्ये राज्यावर ईश्वराची कृपादृष्टी राहावी म्हणून बुरहान निझाम शाह इस्माईल हुसेन यांनी बांधल्याचा उल्लेख आहे. तर तिसरा शिलालेख उत्तरेकडील तटबंदीवर आहे. एक टोकावर असलेले पिराचे स्थान परिसरातील जनतेचे दैवत आहे. आपल्या इच्छापुतीऀ साठी केलेल्या नवसासाठी वा दर्शनासाठी १०० किमी परिसरातील लोक येथे दरवर्षी येतात काही उनाडी वा इतिहासाची जाण नसणारे तटबंदीच्या भिंती लाथेने पाडणे,कोठारघरांची छत फोडणे, भयार घरे व आसपास गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम करणे, नवसाचे बोकड शिजविण्यासाठी भव्य दरवाजाची लाकडे जाळणे असले उद्योग करीत असतात . आतील विपूल चा-यामुळे परिसरातील लोक आपली गायी म्हशी चारण्यासाठी किल्ल्यात कोंडून सोडून जातात दरवाजे नसल्याने काटेरी फांद्या टाकून प्रवेशव्दार बंद करतात. अलीकडच्या काळात दुर्ग संवर्धक मंडळींनी लाकडी दरवाजा तयार करून बसवला आहे. पुर्व पश्चिम नैसगिऀक खोल द-याआहेत. तर दक्षिणेकडे डोगर कापून खिंड केलेली आहे. दक्षिणेकडील खंदकाचे वर बुरुज आहे. या खंदकांत तळाला गुहा असून तो किल्ल्यात जाण्याचा भुयारी मार्ग आहे . मार्ग दगडांनी काहीसा बंद झाला आहे .
या किल्ल्याच्या पूवेऀकडील भागात खाली खेाल दरी ही काळदरी म्हणून ओळखली जाते. या खोल दरीमध्ये आदिवासी ठाकर यांचे अस्तित्व आहे. या दरीत झोपड्या करून राहतात. शेतीही करतात. दोन्ही तिन्ही बाजूला उंच डोंगर असल्यामुळे दिवस उजाडल्यानंतर किंवा दिवस मावळण्या पूर्वी येथे बराच काळ अंधारच असतो. त्यावरून तिला काळ दरी काळोख असणारी दरी असे म्हटले जाते. तेथे दगड चुना वापरुन मोठी तलावाची -धरणाची पुरातन भिंतही बांधलेली आढळते हे काळदरी व हा तलाव म्हणजे नागद येथे सापडलेला ताम्रपटात उल्लेखलेले कायावतार तळे हेच असावे. 'नांदिरपूरद्वारी कायावतार तळ्याजवळ ' ताम्रपटातील या ओळीतील नांदीपूर हे नागत किंवा नागापूर असावे तर कायावतार तळे, हे काळदरी तळे, हल्ली मातीने भरले गेले आहे. यासाठी अधिक संशोधनाची व हा ऐतिहासिक वारसा संरक्षणाची गरज आहे.
डाॅ रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका, कन्नड
जि औरंगाबाद ९४२१४३२२१८
Comments